ट्विटरनं HM अमित शाहांचा प्रोफाइल फोटो हटवला अन् नंतर पुन्हा लावला, दिलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कॉपीराइटच्या नियमांमुळे ट्विटरवर स्वत:चाच फोटो लावण्यासाठी अडथळा आल्याचे समोर आले आहे. अमित शाह यांच्या ट्विटर डीपीवर (प्रोफाइल फोटो) एका व्यक्तीने कॉपीराईटच्या नियमांतर्गत दावा केला होता. त्यानंतर ट्विटरने गुरुवारी काही काळांसाठी अमित शाह यांचा ट्विटरवरील डीपी काढून टाकला होता.

अमित शाह यांच्या ट्विटरवर गुरुवारी रात्री त्यांचा डीपी दिसत नव्हता. त्याठिकाणी ‘Media not displayed’ असा मजकूर दिसत होता. या फोटोवर कोणीतरी दावा केल्यामुळे तो हटवण्यात आल्याचे सुरुवातीस ट्विटरने सांगितले. मात्र, समाज माध्यमात यावरून गदारोळ उठल्यानंतर ट्विटरने काही तासांत पुन्हा अमित शाह यांचा डीपी पुन्हा लावला.

ट्विटरकडून यासदंर्भात स्पष्टीकरण देण्यात आले असून, कॉपीराइटच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमित शाह यांचे अकाउंट लॉक करण्यात आले होते. ही चूक नकळतपणे घडली. परंतु, तदनंतर अमित शाह यांचे अकाउंट पूर्ववत करण्यात आल्याचं, ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून नमूद करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ अमित शाह यांच्या सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. आताच्या घडीस अमित शाह यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या २३.६ कोटी आहे. तर ते स्वतः ट्विटरवर केवळ २९६ लोकांना फॉलो करतात.