Twitter नं बंद केलं होतं Amul चं अकाऊंट, जाणून घ्या कोणत्या गोष्टीवर होता ‘आक्षेप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनविरूद्ध एक पोस्ट टाकल्याने ट्विटरने देशातील सर्वात मोठी दूध डेअरी असलेल्या अमूलचे अकाऊंट डिअ‍ॅक्टिवेट केले होते. मात्र, सोशल मीडियावर लोकांचा ट्विटरविरूद्ध राग व्यक्त होऊ लागल्यानंतर या सोशल मीडिया कंपनीने पुन्हा खाते अ‍ॅक्टिवेट केले. तर अमूलने ट्विटरकडे खाते डिअ‍ॅक्टिवेट केल्याबाबत अधिकृतपणे आक्षेप नोंदवला आहे.

अमूलने पोस्ट केली होती जाहिरात
अमूलने चीनचा संदर्भ देते ट्विटरवर एग्झिट द ड्रॅगन नावाची एक जाहिरात पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये अमूलने लिहिले होते की, चीनच्या वस्तूंचा विरोध करा. अमूलने आपल्या या पोस्टमध्ये आयकॉनिक अमूल गर्लला आपल्या देशाला ड्रॅगनशी लढून वाचवताना दाखवले आहे. याच्या पाठीमागे चीनी व्हिडिओ-शेयरिंग मोबाईल अ‍ॅप टिकटॉकचा लोगोसुद्धा दिसत आहे. याशिवाय यामध्ये मोठ्या-मोठ्या अक्षरात लिहिले आहे की, अमूल ’मेड इन इंडिया’ ब्रँड आहे.

ट्विटरवर अमूलचे आकाऊंट उघडले असता मेसेज दिसत होता की, सावधान : हे अकाऊंट अस्थाई पद्धतीने ब्लॉक आहे. तुम्ही हा मेसेज यासाठी पाहात आहात, कारण या अकाऊंटवरून काही असामान्य अ‍ॅक्टिविटी केल्या गेल्या आहेत. आपण हे अकाऊंट अजूनही व्ह्यू करू इच्छिता.

अमूलने नोंदवली ट्विटरकडे तक्रार
अमूलचे मॅनेजिंग डायरेक्टर आर एस सोढी यांनी म्हटले की, आम्ही ट्विटरला विचारले आहे की, अशाप्रकारे आम्हाला ब्लॉक करण्यापूर्वी आम्हाला माहिती का दिली नाही. त्यांनी आम्हाला सूचना करणे जरूरी होते. आता ट्विटरकडून या सर्व कारवाईबाबत प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.

लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला राग
ट्विटरच्या विरूद्ध लोकांनी सोशल मीडियावर राग व्यक्त करण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत अमुलच्या समर्थनसाठी 19 हजार ट्विट झाले होते आणि हा दुसर्‍या क्रमांकावर ट्रेंड करत होता.