‘बर्थडे’ पार्टीसाठी किती जणांना परवानगी? पुणे पोलिसांनी Birthday Boy ला दिले भन्नाट उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील अडीच महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. एप्रिलमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वेगाने वाढले. रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय विवाह सोहळा केवळ दोन तासात 50 जणांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कोरोना लॉकडाऊनचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपला वाढदिवस साजरा करता येत नाही. शिवाय आपल्या जवळच्या मित्रांना वाढदिवसाची पार्टी देखील देता येत नाही. याच पार्श्वभूमीवर एका पठ्ठ्याने पुणे पोलिसांना ट्विट करुन एक प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाला पुणे पोलिसांनी देखील कडक उत्तर दिले आहे. सध्या पुणे पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शिवानंद दसरवार नावाच्या एका युवकाने पुणे पोलिसांना टॅग करत म्हटले की, सर 1 मे रोजी माझा वाढदिवस आहे. माझे मित्र पार्टीसाठी मागे लागले आहेत. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीसाठी किती जणांना परवानगी आहे, आणि ती भेटण्यासाठी काय करावं लागेल. त्याच्या या प्रश्नाला पुणे पोलिसांनी खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर देऊन नेटकऱ्याची बोलती बंद केली आहे.

पुणे पोलिसांनी शिवानंदच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटले की, तुमच्या मित्रांना लॉकडाऊन काळात घराबाहेर जायचं असेल तर त्यांना आमचा नंबर द्या. आम्ही त्यांना ‘पार्टी’साठी आमंत्रित करु. वाढदिवसाच्या ‘अ‍ॅडव्हान्स’मध्ये शुभेच्छा. घरीच रहा, सुरक्षित रहा !. पुणे पोलिसांनी Birthday Boy ला देलेले भन्नाट उत्तर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक गमतीशीर प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं की, पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करायचा असेल, तर घरातच राहा, ही देखील प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.