जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती पुन्हा ‘आमने-सामने’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पीडीपी पक्षाच्या प्रमुख तसेच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि खासदार गौतम गंभीर यांच्यामध्ये पुन्हा एकदा ट्विटरवॉर रंगलं. मुफ्ती यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्याला राजकीय समस्या असल्याचे म्हटले. तसेच हा मुद्दा सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबतच अन्य घटकांनाही सामिल करून घेण्याची वकिली करताना त्यांनी नवनिर्वाचित गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. समस्येचे निराकरण करण्यासाठी अमित शहा बळाचा अवलंब करतील असा आरोप केला आहे. त्यांच्या या टीकेला आणि आरोपांना गौतम गंभीर याने आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून मेहबूबा यांनी यांनी ट्विट केले आहे की , ‘हा एक राजकीय मुद्दा आहे आणि तो पाकिस्तानसह अन्य घटकांच्या मदतीने राजकीय पातळीवरच सोडवायला हवा. १९४७ पासून सर्वच सरकारांनी काश्मीरकडे सुरक्षेच्याच चष्म्यातून पाहिले. बळाचा वापर करून यामध्ये त्वरित बदल करण्याची नव्या गृहमंत्र्यांची इच्छा हास्यास्पद आहे.’

त्यांच्या या ट्विटला गौतम गंभीर याने प्रत्युत्तर दिले आहे की , ‘आम्ही सर्व कश्मीर समस्येचे निराकरण करण्याबद्दल बोलत आहोत मात्र मेहबूबा मुफ्तींनी अमित शहाची निर्दयी प्रक्रिया म्हणणे हास्यास्पद आहे. इतिहास धैर्य आणि सहनशीलतेचा साक्षीदार आहे. पण जर दंडेलशाही केल्यामुळे माझी लोकं सुरक्षित राहणार असतील, तर दंडेलशाहीही चालेल.’

दरम्यान जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० वरून मेहबुबा मुफ्ती आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये ‘ट्विटरवॉर’ झाले होते. अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान कलम ३७०, अनुच्छेद ३५ए वर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी गृहमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची भेट घेतली होती तसेच सुरक्षा एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी काश्मीरबाबत चर्चा केली होती.