पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. एका अपघातातील मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. हे अपघात मगरपट्टा आणि पुणे-आळंदी रोडवर घडले आहेत.

पुणे आळंदी रोडवर झालेल्या अपघातात प्रल्हाद पंढरीनाथ शिंदे (वय-३८) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय काळे (वय २२) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय यांचे प्रल्हाद हे मामा होते. ते एका कंपनीत काम करत होते. दरम्यान गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून पुणे आळंदी रोडने जात होते. ते फुलेनगर येथील वाटर संपल्यावर येथे आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात गंभीर मार लागल्याने शिंदे यांचा मृत्यू झाला.

तर दुसरी घटना मगरपट्टा जवळील बी. जे. शिर्के कंपनीसमोर घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाची अद्यापही ओळख पटलेली नसून अपघात प्रसंगी त्याच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. त्याचे अंदाजे वय 25 वर्ष असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी धडक देणार्‍या अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक देऊन वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. पोलिस याप्रकरणी शोध घेत आहे.

Visit : Policenama.com