संतापजनक ! आदिवासी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत काढले फोटो, 2 आरोपींना अटक

जुन्नर / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्नर तालुक्यातील तांबे येथील आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांचा एक साथिदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉस्को) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणात सौरभ भगवान वाळूंज, आदित्य गुलाब कबाडी यांना अटक केली आहे. तर त्यांचा तिसरा साथिदार करण शिवाजी वाळूंज (सर्व रा. तांबे) हा फरार झाला आहे. याप्रकरणी पीडीत अल्पवयीन मुलीने सोमवारी (दि.28) जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर या घटनेचे तिव्र पडसाद उमटत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या बहिणीची मुलगी रविवारी (दि.20) शिवणकामासाठी गावातील शिवणकाम करणाऱ्या दुकानात गेल्या होत्या. तेथून घरी परत येत असताना आरोपी सौरक्ष वाळूंज आणि त्याचा मित्र करण वाळूंज यांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी पीडीत मुलीला बैलगाडा घाटाच्या वरच्या बाजूला असलेल्या ज्वारीच्या शेतात ओढत नेऊन बलात्कार केला.

एवढेच नाही तर बलात्कार करताना फोटो काढून याची वाच्चता कोठे केल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी आदित्य कबाडी याच्या गाडीवर बसून निघून गेले. भीतीपोटी पीडित मुलीने या घटनेबाबत कुणालाही सांगितले नाही. मात्र, या प्रकाराबाबत पीडीत मुलीच्या आईला समजल्यानंतर तिने मुलीकडे चौकशी केली. त्यावेळी तिने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे याबाबत सांगितले नसल्याचे आईला सांगितले.

पीडीत मुलीने जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी मदार जावळे आणि पोलिस निरीक्षक जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन दोन आरोपींना अटक केली. तर त्यांचा तिसरा साथिदार फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.