लाच प्रकरणातील ‘त्या’ आरोपीची पोलिसांच्या बेडीतून लग्नाच्या बेडीसाठी जामीनावर सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस असल्याचे सांगून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचे लग्न आजच असल्याने दोघांनाही विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बेडीतून सुटल्यानंतर तो लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी रवाना झाला आहे.

अमित रमेश मोहीते (वय २४, रा. साने कॉलनी, मोरे वस्ती चिखली, पुणे), अर्जुन अच्छेलाल विश्वकर्मा ( वय २८, रा.दगडू पाटील नगर, काळेवाडी, वाकड,पुणे) अशी जामीनावर मुक्तता करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनीटमध्ये कार्यरत असल्याचे सांगून तुमच्या विरोधात तक्रार दाखल आहे. ती मिटवायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील असे सांगून अधिकाऱ्याच्या नावाने १ लाख ६ हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने अमित रमेश मोहीते अर्जुन अच्छेलाल विश्वकर्मा या दोघांना सापळा लावून पकडले. तक्रारदाराकडून त्यांनी ३२ हजार रोख आणि ७४ हजार रुपये बेअरर चेकने स्विकारले होते. दरम्यान त्यांनी पोलीस दलातील एका पावरफुल अधिकाऱ्याचे नाव घेतले. परंतु त्या नावाचा अधिकारी पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेत कार्यरत नाही. मात्र त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून लाच मागितली किंवा कोणाचा या प्रकरणात सहभाग आहे. याच्या तपासासाठी अँटी करप्शनच्या पथकाने त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली.

परंतु अमित मोहिते हा आजच लग्नाच्या बेडीत अडकणार होता. त्याचे लग्न असल्यामुळे त्याच्या वकीलांनी त्याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज सादर केला होता. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी त्यांचा अर्ज मान्य करत दोघांचीही २५ हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली.

दोघांच्या वतीने एड. प्रताप परदेशी, एड. अजिंक्य खैरे आणि एड. सुभाष माछरे यांनी काम पाहिले. दरम्यान अमित मोहिते याचे लग्न मोडले असल्याची माहिती समोर आली आहे.