हैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’मध्ये ठार झालेले 2 आरोपी ‘अल्पवयीन’, कुटूंबियांनी केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये चार आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. परंतू यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. खात्मा करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या कुटूंबीयांनी आरोपींबाबत धक्कादायक दावा केला. आरोपींच्या कुटूंबीयांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर दावा केला आहे की ठार करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोघेजण अल्पवयीन होते. कुटूंबीयांना असाही आरोप केला की या सर्वांना खोट्या चकमकीत ठार करण्यात आले.

या चकमकीमुळे पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर आता चकमकीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चकमकीत ठार झालेले आरोपी नारायणपेठ गुडगंडला आणि जकलैर गावातील रहिवासी होते. या आरोपींमधील नवीन या आरोपीच्या आईने सांगितले की नवीन हा माझा एकुलता एक मुलगा होता. त्याला ठार करण्यात आले तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता. त्याचा जन्म 2002 मध्ये झाला होता. काही वर्षांपूर्वी त्याने शाळा सोडली होती. तो जिथे शिकत होता. त्या चिन्ना पोरमा शाळेतील त्याचा शाळा सोडल्याचा दाखला आम्हाला लवकरच मिळेल.

याच चकमकीत ठार झालेल्या शिवा या आरोपीच्या वडीलांनी मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडले आणि चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझा मुलगा हत्यारबंद पोलिसांच्या पाहाऱ्यातून कसा काय पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतो? त्याला खोट्या चकमकीत मारले गेले. जर माझ्या मुलाने अपराध केला असेल तर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या हवाली केले पाहिजे होते. माझा मुलगा अल्पवयीन आहे असा दावा देखील शिवा या आरोपींच्या वडीलांनी केला.

इतर 2 आरोपींच्या वडीलांनी देखील म्हणजेच चेन्नाकेशवुलू आणि मोहम्मद आरीफ यांच्या वडिलांनी देखील मानवाधिकार आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच या आपल्या मुलांना खोट्या चकमकीत मारण्यात आल्याची शंका उपस्थित केली.

हैदराबादमध्ये 27 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तपासादरम्यान महिलेचा रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह मिळाला. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला. या गुन्ह्यातील 4 ही आरोपींचा शुक्रवारी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अधिक तपासाठी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. त्यात आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, अखेर गोळीबारात त्यांचा खात्मा करण्यात आला.

Visit : Policenama.com