अभिनेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी जगदाळेला कोठडी, तर पोलीस उपनिरीक्षकासह २ अभिनेत्री अद्याप फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रोल नं. १८ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात दाखल गुन्हा मिटविण्यासाठी १५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या राम जगदाळे याला न्यायालयाने १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एटीएसच्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन अभिनेत्री अद्याप पसार आहे.

रोल नं. १८ चित्रपटातील अभिनेता सुभाष यादव याच्याविरोधात त्याच चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी माने हिने वानवडी पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर ते प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी यादवला बोलवून तेथे रोहिणी हिचे पाय धरून माफी मागण्यास भाग पाडले. त्यानंतर याचे चित्रिकरण करून ते व्हायरल केले. याप्रकरणी सुभाष यादव यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकऱणी राम जगदाळे याला पोलिसांनी अटक केली असून तो सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असून त्याच्याकडे मिळालेल्या मोबाईलवरून अधिक तपास सुरु आहे. दरम्यान त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्याचे काम गुन्हे शाखा करत आहे. राम जगदाळे याने कोणाचीही फसवणूक केली असल्यास किंवा त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार असल्यास गुन्हे शाखेच्या युनीट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले आहे.

तर याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले पोलीस उपनिरीक्षक अमोल टेकाळे, अभिनेत्री सारा श्रवण आणि रोहिणी माने यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.