गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून आदिवासींचे हत्यासत्र सुरुच आहे. आज पुन्हा दोन आदिवासी नागरिकांची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली. सदर घटना धानोरा तालुक्यातील मार्केगाव येथे घडली. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या ११ दिवसात नक्षलवाद्यांनी ७ जणांची हत्या केली आहे.

गिरमा कुडयामी आणि समरु अशी मृतांची नावे असून ते दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोली येथे राहत होते. शुक्रवारी ते आपल्या गावी परतत असताना नक्षल्यांनी त्यांना ठार केले. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या ताळगुडा येथील सोनसाय तानु बेग याची हत्या केली होती. तर बुधवारी कोरची तालुक्यातील बेळगाव येथे भाजीपाल्याचा ट्रक पेटवून दिला. तर त्याच रात्री गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील मजगाव येथेही रस्ता कामावरही २ जेसीबी व ४ ट्रॅक्टर नक्षल्यांनी पेटवून दिले होते.

यापूर्वी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील ३ नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. तर दुसऱ्याच दिवशी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर आढळून आले. २५ ते ३१ जानेवारीपर्यंत नक्षल्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात आला होता. या सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर बांधून भीती निर्माण केली होती. काही ठिकाणी झाडे तोडून मार्गही रोखला होता.