Amazon कंपनीच्या वस्तूंवर डल्ला मारणारे दोघे सायबर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अमेझॉन कंपनीच्या वस्तू ग्राहकाने रिटर्न केल्यानंतर त्या कंपनीकडे न पाठवता त्या परस्पर गायब करणाऱ्या दोघांना सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अचल अमोल माणगावकर (वय २६, आनंद पार्क, धानोरी मुळ सावंतवाडी) व राशिद जुम्मन चौधरी (रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अशा लंपास केल्या वस्तू

अमेझॉन कंपनीकडून वस्तूंची विक्री केल्यानंतर ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे. मात्र वेबसाईटवर काही आयडीवरून वस्तूंची बुकींग केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून वस्तू रिटर्न केल्यानंतर त्या डिलिव्हर न होता कंपनीस रिटर्न जाणे अपेक्षित होते. मात्र त्या वस्तू परत पाठविल्यानंतर त्याचे पैसे आणि वस्तू दोन्ही मिळत नव्हत्या. त्यामुळे असे काम कंपनीच्या माहितीतील कर्मचारीच करू शकतात, असा संशय आल्याने कंपनीने अलंकार पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

अशी केली अटक

या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत होता. त्यावेळी विविध पध्दतीने तांत्रिक विश्लेषण केल्यावर पोलिसांनी आरोपी निश्चित केले. ते सावंतवाडीतील असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर एक पथक सावंतवाडी येथे जाऊन अचल माणगावकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचा आणखी एक साथीदार असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी राशीद चौधरी याला ताब्यात घेतले. तेव्हा दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून १७ लाख १३ हजार रुपयांच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आय़ुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, कर्मचारी गावडे, हंडाळ, वाव्हळ, पोतदार, महिला पोलीस कर्मचारी वेताळ, जाबा, निकम, जाधव, पुंडलिक, भोरडे, शेख यांच्या पथकाने केली.