ठेकेदाराला २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांना मजूर पुरविणाऱ्या एका ठेकेदाराकडे २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. हा प्रकार १२ व १३ नोव्हेंबर दरम्यान घडला असून याप्रकरणी लुल्लानगर येथे राहणाऱ्या २७ वर्षीय ठेकेदाराने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मनीष रमेश चावडा (वय ३४, रा़ रास्ता पेठ) आणि तेजस विकास भोर (वय २१, रा़ भोरवाडी, वडगाव, चांडिला, ता़ जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत. या तरुणाबरोबर १० वषार्पूर्वी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मित्राचा मनीष चावडा हा भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा मागील दहा वर्षापासून बंधकाम व्यवसायिकांना मजूर पुरवण्याचे काम करतो. दिवाळी सणानिमीत्त तो नागपूरला गेला असता त्याला एक फोन आला. फोन करणाऱ्याने तुला मारण्याची सुपारी घेतली असल्याचे सांगितले. तसेच २५ लाख रुपये नाही दिले तर जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सलग दोन दिवस वेगवेगळ्या नंबरवरुन या तरुणाला फोन करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दिवाळी संपवून ते पुण्यात आले असता पुन्हा त्यांना फोन आला. आरोपींकडून त्याच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधला.

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्याने आपण एवढे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगून १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार मंगळवारी (दि.१३) रात्री त्यांनी रास्तापेठेतील शाहू उद्यानाजवळ पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी तरुण हा बनावट नोटांचे बंडल घेून तेथे पोहचला. त्यावेळी पैसे घेत असताना दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी तेजस भोर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत मनीष चावडा याने सुपारी दिल्याची कबुली भोर याने दिली. पोलिसांनी चावडा यालाही अटक केली.

मनीष चावडा याचा भाऊ संदीप चावडा हा या तरुणाबरोबर दहा वर्षांपूर्वी वडगाव येथील सिंहगड इस्टिट्युट येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शिकत होते. त्यामुळे तो त्याला व मनीष चावडा याला ओळखत होता. पुढील तपासासाठी दोघांना खडक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे व त्यांचे सहकारी महेश कदम, प्रमोद मगर, धिरज भोर, मंगेश पवार, अमोल पिलाणे यांनी केली आहे.