मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक ; सव्वा कोटी रुपयांचे मांडूळ जप्त

वसई : पोलीसनामा ऑनलाईन – मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी आलेल्या दोघांना पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मांडूळ प्रजातीचा सव्वा कोटीचा साप जप्त केला आहे.

शशांत मोदलीयार (वय ३२) व मोसीन कुरेशी (वय ३०) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी दोन जण नालासोपारा येथील स्थानकाच्या पश्चिमेकडे येणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना सापळा रचून अटक केली . बाजारभावाप्रमाणे या सापाची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. असे पोलिसांनी सांगितले. दोघांनाही न्यायालयाने २२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.