बालकलाकार म्हणून काम देण्याच्या बहाण्याने गंडविणार्‍या मध्यप्रदेशातील दोघांना शिर्डीतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी दूरचित्रवाहिनीवरील मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याच्या आमिषाने एका व्यावासायिकाची ५५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डीतून अटक केली आहे.

वैभव महेश श्रीवास (वय २५, रा. ग्वाल्हेर मध्यप्रदेश) आणि सोरव महेश श्रीवास (वय ३४, ग्वालेर मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकं काय घडलं ?
तक्रारदार व्यावसायिक कोंढवा भागातील एनआयबीएम रस्त्यावर वास्तव्यास आहेत. व्यावायिकाने खासगी दूरचित्रवाहिनीवरील एका मालिकेत बालकलाकारांना संधी अशा आशयाची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावरुन त्याने वैैभव महेश आणि जयंतसिंग तोमर असे नाव सांगणाऱ्या आरोपींबरोबर संपर्क साधला. व्यावसायिकाच्या बारा वर्षीय मुलीला हिंदी मालिकेत बालकलाकार म्हणून काम देण्याचे आमिष दोघांनी दाखविले होते.

त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने व्यावसायिकाने आरोपींच्या खात्यात ५५ हजार रूपये जमा केले. त्यानंतर त्यांनी तोमर आणि महेश यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर या गुह्याचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती मिळाली की, यातील आऱोपी शिर्डी येथे येणार आहेत. त्यानुसार सायबर सेलचे एक पथक शिर्डीला रवाना झाले. त्यांनी तेथे गेल्यावर सौरव श्रीवास याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा भाऊ वैभव श्रीवास यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, कर्मचारी नितीन चांदणे, शिरीष गावंडे, योगेश वाव्हळ, संतोष जाधव यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त-
चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार
नवजात बाळांच्या ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
लहान मुलांना पॅरासिटामॉल देताना घ्या ‘ही’ काळजी

You might also like