भाड्याचे पैसे मागण्यासाठी त्यांनी लढविली बनावट तिकीटाची शक्कल, पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विमानतळावर ड्रॉप करण्यासाठी गेल्यावर महिलेने भाड्याचे पैसे न दिल्याने ते पैसे मागण्यासाठी बनावट विमान तिकीट दाखवून विमानतळामध्ये गेलेल्या दोघांना सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी पकडून विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक कली आहे.

सुधीर बाळकृष्ण शिंदे (४०, रा. किरकटवाडी, खडकवासला), सुमीत दिलीप मालुसरे (२८, सोमवार पेठ, सम्यक चेंबर्स, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सीआयएसएफचे अधिकारी मनोज राममुर्ती (४३) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत मालुसरे याचा खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय आहे. तर सुधीर शिंदे हा त्याच्या वाहनावर चालक आहे. ते दोघे गुरुवारी सायंकाळी ०४:३०च्या सुमारास पुणे विमानतळावर प्रवासी सोडण्यासाठी आले होते. त्यावेळी एक प्रवासी महिला त्यांचे पैसे न देता विमानतळामध्ये गेली. दोघेही विमानतळाबाहेर थांबले होते. त्यानंतर त्या महिलेला पैसे मागण्यासाठी बाळकृष्ण शिंदे तिच्या मागे गेला. विमानतळामध्ये प्रवाशांशिवाय इतरांना प्रवेश करता येत नाही. त्यामुळे मालुसरे याने इंडिगो एअरलाईन्सचे बनावट तिकीट व्हाट्स अपद्वारे शिंदेला पाठवले. त्यानंतर त्या तिकीटाच्या आधारे शिंदेने विमानतळामध्ये प्रवेश केला. तो प्रस्थान गेट क्र. २ येथे गेल्यावर सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले आणि तिकीट पाहिल्यावर ते बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर ते तिकीट त्याने मालुसरे याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले. दोघांनाही सीआयएसएफच्या जवनांनी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.