‘या’ बँकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक ; शाखा अधिकाऱ्यासह वकील गजाआड

कोल्हापूर : पोलीसमामा ऑनलाइन – कर्जदाराच्या नावे एक गुंठाही जमीन नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे पिक कर्ज व पाईपलाईन कर्ज मंजूर करणाऱ्या आयडीबीआय बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह बँकेच्या पॅनलवरील वकीलाला करवीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. करवीर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली.

तत्कालीन बँक अधिकारी जयवंत यशवंत गंदे (वय-४९ रा. शिवाजी पेठ) आणि बँकेच्या पॅनलवरील वकील चंद्रशेखर गोविंद कुलकर्णी (वय-५९ रा. महाद्वार रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यापूर्वी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील आडीबीआय (IDBI) बँकेत पीक व पाईपलाईन कर्ज मिळवण्यासाठी राजाराम दादू पाटील याने २०१६ मध्ये म्हालसवडे गावच्या तलाठ्याच्या सही शिक्क्याने आठ अ आणी ७/१२ उतारे देऊन बँकेतून २३ लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. हा प्रकार ऑक्टोबर २०१८ मध्ये उघडकीस आल्यानंतर आयडीबीआय बँकेची सुमारे ४५० खातेदारांची ८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले.

पोलिसांनी यापूर्वी या फसवणूक प्रकरणातील मुख्य सुत्रधार राजाराम पाटील आणि त्याची पत्नी, दोन मुले, सुना तसेच तलाठी, बनावट कागदपत्रांचा पुरवठा करणारा संतोष पाटील यांना अटक केली आहे. संतोष पाटील याने तलाठ्याच्या सही शिक्क्यासह बनावट सात बारा, आठ अ या कागदपत्रांचा पुरवठा केला होता. या बनावट कर्ज प्रकरणाचा करवीर पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता. आयडीबीआय बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी गंदे याने कर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी न करता तसेच जागेवर भेट न देता कर्ज मंजुर केले होते. तर वकिल कुलकर्णी याने कर्जदाराच्या नावे एक गुंठा जमीन नसताना सर्च रिपोर्ट बँकेला सादर केला. या गुन्ह्याचा तपास करणारे तपास अधिकारी अरविंद कांबळे यांनी दोघांची स्वतंत्रपणे चौकशी केली.

तपासी अधिकारी कांबळे यांनी केलेल्या चौकशीत गंधे आणि कुलकर्णी हे दोघे दोषी आढळले. या दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची आठ कोटी रुपयांची फसवणूक केली. त्यांनी तब्बल ४५० कर्जदारांच्या नावे ही रक्कम उचलल्याचे चौकशीत समोर आले. त्यामळे करवीर पोलिसांनी शुक्रवारी दोघांनाही या प्रकरणात सहआरोपी करून अटक केली. पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत.