येरवड्यात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला भरदिवसा लुबाडणाऱ्यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा येथे गजबजलेल्या नगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयासमोर भरदिवसा फायनान्स कंपनीची रक्कम घेणाऱ्या व्यक्तीला अडवून चौघांनी ३ लाख ११ हजारांची रोकड लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

विशाल कैलास बाणेकर (वय २३, रा. समता मित्र मंडळाजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा) व आकाश वसंत कंचीले (वय १९, लक्ष्मी नगर येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर क्षीरसागर (वय ३७,रा.आळंदी रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

काय घडलं होतं ?

क्षीरसागर एका खासगी फायनान्समध्ये नोकरी करतात. त्यांच्याकडे विश्रांतवाडी, प्रतिकनगर, नागपूर चाळ, येरवडा भागातील व्यावसायिकांकडून रक्कम जमा करण्याची जबाबदारी आहे. फायनान्स कंपनीचे मालक मुकेश गोयल यांनी त्यांना शुक्रवारी सकाळी व्हॉटसअ‍ॅपवर यादी दिली होती. त्या यादीनुसार क्षीरसागर हे रोकड जमा करत होते. त्यावेळी दुपारी दीडच्या सुमारास ते येरवड्यातील क्षेत्रीय कार्यालयासमोरून कोरेगाव पार्कच्या दिशेने जात होते. त्यावेळी

एकाने त्यांना तेथील बसस्टॉपसमोर अडविले. त्यानंतर त्याने अचानक त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरूवात केली. माझ्या अंगावर गाडी का घातली ?, अशी विचारणा करत त्याच्या इतर साथीदारांसोबत झटापट करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. त्यानंतर क्षीरसागर यांची सॅकबॅग आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले. त्या सॅकमध्ये क्षीरसागर यांनी जमा केलेले ३ लाख ११ हजार ८०० रूपये होते. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

य़ा गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. त्यावेळी पोलीस नाईक सुरेंद्र साबळे, पोलीस शिपाई सागर घोरपडे यांना दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल बाणेकर आणि आकाश कंचिले हे सादलबाबा दर्ग्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

पैसे बॅगेत ठेवताना पाहून रचला कट

पोलिसांनी दोघांकडे तपास केल्यावर त्यांनी क्षीरसागर यांना पैसे मोजून बँगेत ठेवताना गोल्फ क्लब येथील दुकानात पाहिले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल बाणेकर याने साथीदारांसोबत मिळून हा कट रचला होता. यापुर्वी त्यांच्या काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली. परंतु विशाल बाणेकर हा फरार होता. ते गुन्हा केल्यानंतर चोरीच्या पैशांच्या हिश्श्याची वाटणी करून वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले होते.

चोरीच्या पैशातून मॉलमधून खरेदी केले कपडे

यातील अटक करण्यात आलेले सर्व तरुणांनी १० वी , १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी शिक्षण सोडले आहे. त्यानंतर सर्वजण बेरोजगार आहेत. त्यांनी चैनीसाठी चोरी केली. त्यानंतर मॉलमधून कपडे खरेदी केले व मौजमजा केली.

तर यातील विशाल बाणेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या तडीपारीची मुदत संपली आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आय़ुक्त भानुप्रताप बर्गे, यांच्या मार्गदर्शाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंझाड, कर्मचारी करीम सय्यद, शंकर पाटील, सुरेंद्र साबळे, सागर घोरपडे, सचिन ढवळे, अशोक शेलार, राकेश खुणवे, जितेंद्र तुपे, गणेश साळुंखे यांच्या पथकाने केली.

आरोग्य विषयक वृत्त –

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

प्रदूषणापासून करा ” केसांचा ” बचाव

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी