‘या’ महिला सरपंचाच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बेड्या

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – राजकिय वैमनस्यातून नऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच महिलेच्या पतीला कारची घडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍यासह त्याच्या मित्राला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा. विठ्ठल कलावती निवास, नऱ्हे गाव) आणि नितीश कैलास थोपटे (वय ३०, रा. धायरी) अशी अटक कऱण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पाच दिवासांपुर्वी पुणे बंगळुरु महामार्गालगतच्या रस्त्यावर महिला सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

बाळासाहेब वनशिव आणि त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर पहाटे साडेपाचच्या सुमारास मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर फिरायला गेले होते. त्यावेळी सर्विस रस्त्यावर वनशिव यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारने जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. नऱ्हे येथील ग्रामपंचायत निवडणूका मागील वर्षी पार पडल्या. त्यावेळी मिनाक्षी वनशिव या सरपंच पदासाठी उभ्या होत्या. त्यांनी अविनाश कांबळे यांच्या पत्नीचा पराभव केला होता. त्यामुळे त्या नऱ्हे गावच्या सरपंच झाल्या. तसेच त्यांच्यात एका जमिनीवरुन वाद देखील होता. त्याकारणावरून वनशिव यांना कांबळे यांनी बघून घेण्याची धमकी दिली होती. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

या घटनेनंतर कांबळे आणि थोपटे पसार झाले होते. भारती विद्याापीठ पोलिसांकडून या गुन्हयाचा तपास करण्यात येत होता. परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त व्ही. पी. नांदेडकर यांनी या प्रकरणी तातडीने तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार कोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असल्याची माहिती सहाय्यक फौजदार प्रदीप गुरव, जगदीश खेडेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथून कांबळे आणि साथीदार थोपटे याला ताब्यात घेतले.

कांबळे यांच्या पत्नी माजी सरपंच होत्या, त्यांचा पराभव मिनाक्षी वनशिव यांनी केल्याने राजकिय वैमनस्यातूनच त्यांच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त व्ही. पी. नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव संकपाळ, शिवदत्त गायकवाडी यांनी केली.