दोन संशयित दहशतवाद्यांना नागपुरात अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – उपराजधानीत दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्या दोघांना लष्करी गुप्तचर यंत्रणेने (मिलिटरी इंटेलिजन्स) ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. हे आरोपी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होते. तसेच सातत्याने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांपासून मिलिटरी इंटेलिजन्सचे काही अधिकारी व कर्मचारी शहरात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही कारवाई केली. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईच्या वृत्तोला दुजोरा दिला. मात्र, अधिक माहिती देण्यास नकार दिला. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकजण नांदेडचा तर दुसरा उत्तरप्रदेशातील असल्याचे समजते.

दिवाळीच्या सणात घातपात घडवून आणण्याची या संशयीत दहशतवाद्यांची योजना होती. गेल्या काही दिवसांपासून ते सॅटेलाईट कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशवादी संघटनांच्या सतत संपर्कात होते. मात्र, लष्कराच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून शहरात वास्तव्यास होत्या. त्यांच्या निवासस्थानावरून काही साहित्यही जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. या दोघांवरही शहरात गुप्तपणे दहशतवादी कृत्यांना चालना देणाऱ्या स्लीपर सेल्सची उभारणी करण्यात येत असल्याचा संशय आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. नागपुरात पाकिस्तानचे नागरिक राहत असल्याच्या सैन्य दलातील गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. गणेशपेठ पोलिस ठाण्यात एकूणच या प्रकरणात पुढील कारवाई करण्यापूर्वी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

त्यानंतर शहरातील काही ठिकाणी चौकशीचे सत्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात मध्य नागपूर, आशिर्वाद सिनेमागृहाचा मागचा भाग आणि घाट रोड जवळच्या परिसरातही धाडी टाकण्यात आल्याचे समजते. उपराजधानीतील ब्रम्होस एअरोस्पेश या कंपनीचा वरिष्ठ वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला ९ ऑक्टोबरला उत्तरप्रदेश एटीएसने अटक केली होती. त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला ब्रम्होस या सुपरसोनिक मिसाईलचे कोडिंग पुरवल्याचा आरोप होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा दहशतवादविरोधी कारवाई नागपुरात करण्यात आली आहे.