Bank Fraud Case in Pune : दोघांना हैदराबादमधून 25 लाखांसह अटक; सुधीर भटवेरा अद्याप फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बँकेतील निष्कीय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना सायबर पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली आहे. दरम्यान ज्याच्या घरासमोर पोलिसांनी 25 लाखासह तिघांना पकडले होते. तो सुधीर भटेवरा हा फरार झाला आहे.

लक्ष्मीनारायण गुट्टू ऊर्फ सोन्या (वय 32, रा. बौद्धनगर, हैदराबाद) आणि व्यंकटेश सुब्रम्हण्यम उपाला (वय 40, रा. भांदलागुंडा, नागोल, हैदराबाद) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 13 जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 22 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान लक्ष्मीनारायण गुट्टू याने राजशेखर ममीडी यांच्या व्हॉटस्अ‍ॅ‌पवर 25 कोटी 77 लाख 78 हजार 908 रुपये तसेच दुसऱ्या व्हॉटस्अ‍ॅ‌पवर 3 कोटी 5 लाख 60 हजार 355 रुपयांच्या किमतीची शिल्लक असलेल्या खात्यांची माहिती पाठविल्याचे आढळले आहे. त्याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे, अशी माहिती सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी न्यायालयात दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणातील मास्टर माईंड अनघा मोडक हिच्या मोबाईल फोनच्या माहितीचे एक्सट्रॅक्शन केले असता, त्यातील संभाषणामध्ये सर्व आरोपींचा उल्लेख व त्यांच्याशी बोलणे झाल्याचे आढळून आले आहे. अनघा मोडक, रोहन मंकणी, राजेश शर्मा, परमजितसिंग संधू हे सर्व जण 10 आणि 12 मार्च रोजी नवी पेठेतील सॅफरॉन हॉटेलमध्ये एकत्र येऊन तिथेच थांबून चर्चा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली त्याची माहिती घ्यायची आहे. मोडक हिच्या घराची तसेच कार्यालयाची झडती घेतली असून 7 हार्डडिस्क व एक टॅब जप्त केला आहे. या लॅपटॉपचा तिने गुन्ह्यासाठी वापर केला आहे का? या गुन्ह्यात एका बँकेतील एक खाते व अन्य बँकेतील 3 खात्यांची माहिती संबधित बँकेने सादर केली असून, त्या खात्यांमध्ये 209 कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. या खात्यातील पैसे आरोपी हे कोणत्या प्रकारे हॅक करून त्यातील रक्कम ही एका बँक खात्याव्यतिरिक्त दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणार होते याचा तपास करायचा असल्याचे म्हटले आहे.