Kolhapur News : काय सांगता ! होय, चक्क कळंबा जेलमध्ये दोघे वापरायचे मोबाईल, झाली अटक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कळंबा कारागृहात संरक्षण भिंतीवरुन मोबाईल फेकल्याचे उघडकीस आले होते. त्याप्रकरणी मोबाईल फेकणाऱ्या टोळीतील राजेंद्र उर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०, रा जयसिंगपूर) याच्यासोबत कारागृहात मोबाईलचा वापर करणाऱ्या ओंकार उर्फ मुरली दशरथ गेजगे (२२, रा. शहापूर, इचलकरंजी) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. ओंकारला कळंबा कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

२२ डिसेंबर रोजी कारागृहात तीन पुड्यांमधून दहा मोबाईल व गांजा फेकल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. टोळीतील हृषीकेश पाटील याचा माग काढून भीष्म्या उर्फ भीमा चव्हाण, राजेंद्र उर्फ दाद्या धुमाळ, जयपाल वाघमोडे, अशी नावे पोलिसांना निष्पन्न झाली होती. याप्रकरणी आजवर हृषीकेश पाटील, शुभम ऐवळे या दोघांना अटक केली होती. तर संशयित राजेंद्र उर्फ दाद्या धुमाळ याला गुरुवारी अटक करण्यात आली.

गेजगेकडून कारागृहात मोबाईल वापर
पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार उर्फ मुरली गेजगे हा खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असून, तो कारागृहात मोबाईलचा वापर करत होता. मोबाईलमधील सिमकार्ड हे त्याचा मामेभाऊ शुभम ऐवळे यांच्या नावावर आहे. सिमकार्डवरुन ‘मोका’तील संशयित विकास खंडेलवाल याने फोन करुन भीष्म्या उर्फ भीमा चव्हाणकडे मोबाईलची मागणी केली. त्याच्या सांगण्यावरुनच कारागृहात दहा मोबाईल फेकल्याची माहिती मिळत आहे. तसेच गेजगेकडे असलेले सिमकार्ड हे तीन महिन्यांपासून अ‍ॅक्टिव्ह, असल्याचे तपासात पुढे येत आहे.

पैलवानाच्या ताकदीचा वापर
हृषीकेश पाटील हा पैलवानकी करत असल्याने, ताकदीच्या जोरावर त्याने संरक्षण भिंतीवरुन मोबाईलचे पुडे कारागृहात फेकल्याचे माहिती तपासात मिळाली. यापूर्वी सुद्धा हृषिकेशने अशा वस्तू फेकल्याची माहिती त्याने पोलिसांना चौकशीवेळी दिली. दरम्यान, पोलीस या प्रकरणातील मुख्य संशयित भीष्म्या उर्फ भीमा चव्हाण याचा शोध घेत आहेत. भीमा चव्हाणच्या अटकेनंतर फेकलेले मोबाईल कोणाला मिळणार होते ? त्याच्या खरेदीसाठी पैसे कोणी दिले होते? त्यात कारागृहातील कोणाचा समावेश आहे ? या प्रश्नांची उत्तरे मिळतील.