सांगली : बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून खून केल्याप्रकरणी दोघे अटकेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जत तालुक्यातील मुचंडी येथील गायरान माळावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह 20 डिसेंबर रोजी सापडला होता. या खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास सांगली पोलिसांना यश आले. बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी समाधान दिलीप चौधरी (वय २७, नाळेवरती, टेंभूर्णी) व सागर विष्णू जमदाडे (वय ३०, रा. कसबापेठ शिवाजीनगर, टेंभूर्णी) यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी सुशांत नागनाथ चौधरी (वय ३०, रा. टेंभूर्णी,ता.माढा) याचा खून केला होता.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडीजवळ एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता. अज्ञाताने त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता. मयताचे नाव अथवा ओळखीचा कोणताही पुरावा नसल्याने गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी याचा गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी तपास सुरू केला होता.

यातील मृृृत टेंभूर्णी येथील सुशांत चौधरी असल्याचे समजले. सुशांतचे समाधान चौधरी याच्या बहिणीशी अनैतिक संबंध होते. ती सध्या भाऊ समाधानकडे रहात होती. तिला माझ्यासोबत पाठवून दे असा तगादा सुशांतने त्याच्याकडे लावला होता. बहिणीला माझ्याकडे सोडले नाहीतर जीवन उध्वस्त करण्याची धमकी सुशांत देत होता.

हाच राग मनात धरून शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी समाधानने ऑफीसच्या टेरेसवरती चर्चा सुरू असताना सागर जमदाडेही तिथे आला. त्यावेळी समाधान व सुशांत यांच्यात वादावादी सुरू झाली. याच रागात समाधानने सुशांतला टेरेसवरून खाली ढकलले. त्याला मार लागल्याने तो बेशुध्द झाला. यानंतर संशयितांनी मोटारीतून जत तालुक्यातील मुचंडी येथील गायरान जमिनीत आणून त्याच्या डोक्यात दगड घातला व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. एलसीबीने तपास करत दोघा संशयितांना अटक केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/