कोल्हापूर : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना विषाणूने लोकांची परिस्थिती बिकट केली आहे. दैनंदिन वाढणारी रुग्णसंख्या आणि रुग्णांना योग्य तो उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहे. त्यात राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा पडत असतानाच अशातच रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योगीराज राजकुमार वाघमारे ( रा. न्यू शाहुपुरी, सासणे मैदान, कोल्हापूर) आणि पराग विजयकुमार पाटील (रा. कसबा बावडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रेमडीसीवीरचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी, येथील, एक टोळीने रेमडीसीवीर इंजेक्शन चढ्या दराने विकले आहेत. साडेपाच हजारांचे इंजेक्शन तब्बल १८ हजार रुपयांनी चढ्या दराने विकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून कोल्हापूर LCB कडून त्यांना अटक करण्यात आलीय. दरम्यान, याबाबत माहिती LCB चे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापुरात सासणे मैदान परिसरातील “मणुमाया” या इमारतीच्या तळमजल्यावर छापा टाकून योगीराज वाघमारे ( BSC तृतीय वर्ष शिकत आहे.) याला ताब्यात घेतले.

या दरम्यान, अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे विक्री करण्यासाठी कब्जात बाळगलेल्या रेमडेसिवीर या औषधाच्या ३ बाटल्या मिळून आल्या. नंतर त्याने ती औषधे पराग पाटील (मेडिकल सेल्समन) यांच्याकडून घेतल्याचे म्हटले. पाटील हा रेमडेसिविर औषधाच्या आणखीन बाटल्या घेऊन येणार असल्याची माहिती योगिराजने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पराग पाटील यालाही अटक केली. त्याच्याकडे रेमडेसिविर या औषधाच्या ८ बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी एकूण ११ बाटल्या जप्त केल्या आहेत.