2,50,000 ची लाच मागणाऱ्या पोलिसासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन  – खामगाव येथील शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील आंबुलकर यांचे रायटर शिवशंकर सखाराम वायाळा यांच्यासह एकाला अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.

शिवशंकर वायाळ आणि राजेश झिने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वायाळ हे सुनील आंबुलकर यांचे लेखनिक म्हणून शहर पोलीस ठाण्यात काम करतात. त्यांनी राजेश झिने याला बरोबर घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदाराकडे साडेसात लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील अडीच लाख रुपये राजेश झिने याच्यामार्फत देण्यास सांगितले.

तसा करारनामाही करुन घेतला. खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडे या दोघांनी अडीच लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीची पडताळी केल्यावर दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार सह कलम ३८५, १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.