तब्बल १६ महिने गुन्हा दडपल्या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह २ सहायक पोलिस निरीक्षक दोषी

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – तब्बल सोळा महिने गुन्हा दडपून तपासात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केल्याबद्दल तत्कालीन पोलीस निरीक्षक बंडुपंत कोंडूभैरी यांच्यासह दोन सहायक पोलीस निरीक्षक व तपासी अंमलदार यांना दोषी ठरविले आहे.

बावडा येथील युवक रश्मिकांत रजनिकांत तोरणे यांच्या हत्याप्रकरणी पुण्याच्या विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने हा निकाल दिला असून त्यांच्यावर कारवाईसाठी राज्याच्या गृह विभागास व जिल्हा ग्रामीण पोलीसप्रमुखांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
रश्मीकांत तोरणे यांचे चुलते पत्रकार उमाकांत तोरणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल रिटपिटेशन दाखल करून हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकारी व ठाणे अंमलदारावर कठोर कारवाई करावी, अशी विनंती केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन, पोलिसांविरुद्ध तक्रारीचे परिमार्जन करण्यासाठी शासनाने विभागीय स्तरावर पोलीस तक्रार प्राधिकरण नेमले आहे. त्या ठिकाणी दाद मागण्याचा आदेश दिला, त्यानुसार तोरणे यांनी पुण्याच्या प्राधिकरणाकडे न्याय मागितला.

प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रमेश जोशी, सेवानिवृत्त पोलीस उप महानिरीक्षक चंद्रकांत कुंभार, पुण्याचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी या गुन्ह्यातील तपासी अंमलदार अंकुश खोमणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे व विलास नाळे यांना दोषी ठरवून निकाल जाहीर करण्यात आला.

तक्रारदाराच्या वतीने अ‍ॅड. कमलाकांत तोरणे व अ‍ॅड. डी. ए. लवटे यांनी काम पाहिले. रश्मिकांत याचे १५ मार्च २०१५ रोजी गुंडप्रवृत्तीच्या तरुणांनी अपहरण करून त्याची हत्या केली होती. पोलिसांनी तब्बल सोळा महिने हा गुन्हा दडपला होता, तोरणे कुटुंबीयांनी कोल्हापूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयासमोर तपासासाठी उपोषण, आंदोलन चालू केले होते.
या तपासकामी हलगर्जीपणा केल्याबद्दल तत्कालीन पोलीस निरीक्षक बंडूपंत कोंडूभैरी यांनाही दोषी ठरवले आहे, तर मधुकर शिंदे यांच्या कसुरीच्या अनुषंगाने पुरावा पुढे न आल्याने व त्यांनी केलेल्या तपासाचा भाग न्यायप्रविष्ट असल्याने प्राधिकरण यावर भाष्य करू शकत नाही, असे निकाल पत्रात म्हटले आहे. याशिवाय पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये फिर्यादी विरुद्ध खोट्यानाट्या नोंदी करून बचावाचा प्रयत्न केल्याबद्दल निकालपत्रात कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like