भारतात घुसखोरी करणारे दोन बांग्लादेशी अटकेत

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या दोन बांग्लादेशी नागरिकांना ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार शाखेच्या पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एका बांग्लादेशीकडे भारतीय आधारकार्डसह, पॅनकार्ड आणि पासपोर्टही मिळाले आहे. गुन्हे शाखेकडून याची माहिती दहशतवादविरोधी पथक व आयबीला देण्यात आली आहे. त्यांना भारतात आश्रय देणाऱ्यांचा व त्यांना ही ओळखपत्रे बनवून देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

जहिर अन्साल मंडोल (२८), शेमूल दाऊद खान  (२६) अशी दोघांची नावे आहेत.

बांग्लादेशी नागरिक उल्हासनगर येथील आशेळे गावातील हनुमान कॉलनीत राहात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर त्यांनी या माहितीच्या आधारे तेथे छापा टाकला. त्यावेळी दोघांनाही तेथून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर ते दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा वास्तव्य करत आहेत. तसचे जहिर हा रंगकाम तर शेमूल हा फिटरचे काम करत असल्याचे समोर आले. जहिर मंडोल याच्याकडे बनवाट जन्म दाखला, आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे आहेत. त्यांच्या मदतीने त्याने पासपोर्ट तयार केल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे भारतीय पासपोर्टही मिळाले असून दोघांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.