अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट, दुचाकीवरील एकाचा मृत्यू

पालम (परभणी) : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या कारची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीवरील दोघेजण भाजले. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री पालम-गंगाखेड रोडवर घडली.

संभाजी गणपती कोरडे (वय-४५ रा. रोकडेवाडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून अंगद बाळासाहेब मुलगीर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संभाजी आणि अंगद हे दुचाकीवरुन (एमएच २२ एके ८१७५) गंगाखेडहून पालमकडे जात होते. त्याचवेळी भरधाव वेगात जाणारी कार (एमएच २२ यू ७४७५) गंगाखेडच्या दिशेने जात होती. गंगाखेड ते पालम या रस्त्यावर लाकडी मशीनजवळ या दोन्ही वाहनांची धडक झाली. अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला.

या अपघातात दुचाकीवरील संभाजी गणपती कोरडे आणि अंगद बालासाहेब मुलगीर हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांनाही पालम येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना संभाजी कोरडे यांचे निधन झाले. तर अंगद मुलगीर यांना नांदेड येथे हलविण्यात आले आहे.