भाजपवर मित्रपक्ष नाराज ; ‘हे’ मंत्री आज देणार राजीनामा

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकही जागा न दिल्याने नाराज झालेले सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशमधील मागासवर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर आज आपल्या सर्व पदाचा राजीनामा देणार आहे.

ओम प्रकाश राजभर हे पूर्वी मायावती यांच्या बसपमध्ये होते. पण त्यांच्याशी मतभेद झाल्याने ते २००४ मध्ये बसपमधून बाहेर पडून त्यांनी आपला स्वत: सुहेलदेव भारतीय समाज पार्टीची स्थापना केली. त्यांच्या पक्षाने विजय मिळविण्यापेक्षा इतरांना विजयात अडथळा आणण्याचे जास्त काम केले. पूर्व उत्तर प्रदेश व बिहारच्या काही भागात या पार्टीचा चांगला जोर आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत भाजपने त्यांच्याशी युती केली. सत्तेवर आल्यावर योगींनी त्यांना मंत्री केले. त्याचबरोबर त्यांच्या पक्षातील ६ जणांना विविध महामंडळावर घेतले.

लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला जागा मिळाव्यात अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर फेब्रुवारीपासून संपर्क साधून अनेक वेळा चर्चा केली. मात्र, आता शेवटच्या क्षणी त्यांना आपली युती विधानसभेसाठी झाली असल्याने लोकसभेच्या जागा मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले ओमप्रकाश राजभर यांनी आपल्या मंत्री पदाबरोबर सर्व पदांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारीही आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. प्रियंका गांधी यांच्या प्रवेशाने पूर्व उत्तर प्रदेशात चुरस वाढली आहे. त्यात दुसऱ्यांच्या विजयात खोडा घालणारा पक्ष म्हणून सुहेलदेव भारतीय समाज पार्टीला ओळखले जाते. असा पक्ष जर दूर जात असेल तर भाजपच्या पूर्व उत्तर प्रदेशात अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.