आमदाराच्या वाहनाच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – साक्रीचे आमदार डी.एस. अहिरे यांच्या वाहनाची धडक एका दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीवरील दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी साक्री-पिंपळनेर रोडवरील धाडणे फाट्याजवळ घडली. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प होती. शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे असे मृत्यू झालेल्या सख्ख्या दोन भावांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार डी.एस आहिर यांच्या इनोव्हा कारची आणि मृत सोनवणे यांच्या दुचाकीची सोमोरासमोर धडक झाली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सोनवणे भावंडाचा जागीच मृत्यू झाला. सोनवणे हे दुचाकीवरून साक्री गावाडकडे जात होते. त्यावेळी धडणे फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

अपघातनंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. लग्न समारंभासाठी जात असताना सोनवणे भावंडाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची चर्चा घटनास्थळी आहे. या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी काही वेळासाठी रास्ता रोको केला. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.