Pune : अवघ्या 10 दिवसांत दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

शिक्रापूर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील एका कुटुंबियांसाठी कोरोना व्हायरस घातक असा ठरला आहे. कारण या गावातील दोन सख्ख्या भावांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विशाल कृष्णकांत गायकवाड आणि तुषार कृष्णकांत गायकवाड अशी या दोन भावंडांची नावे आहेत. 22 एप्रिलला विशालचा कोरोनाने मृत्यू झाला. सर्व अंत्यविधी त्याचा धाकटा भाऊ तुषारने पार पाडले. त्यानंतर तुषार यालाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची ऑक्सिजन लेव्हल खालावली. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान 3 मेला मृत्यू झाला. यामध्ये पहिल्या मुलाच्या मृत्यूचे दु:ख संपले नव्हते तोच दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाल्याने गायकवाड कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दहा दिवसांत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, विशाल आणि तुषार यांचे वडील कृष्णकांत गायकवाड यांचे वय 62 वर्ष असून, त्यांच्या पत्नी मंगल कृष्णाकांत गायकवाड या 56 वर्षांच्या आहेत. त्यांना विशाल, सागर, प्रियांका आणि तुषार अशी एकूण चार मुले आहेत. मात्र, कोरोना व्हायरसने त्यांच्या दोन्ही मुलांना विळख्यात ओढले आणि दुर्दैवाने त्यांचा यामध्ये मृत्यू झाला.