‘रोजगारवाढी’साठी मोदी सरकारची दोन कॅबिनेट समित्यांची स्थापना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली देशाच्या अर्थव्यवस्थेतील मंदी व वाढत्या बेरोजगारीशी सामना करण्यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय रोजगार आणि कौशल्य विकासावर आधारीत आणखी एक समिती स्थापन्यात आली आहे.

देशातील बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. २०१७-१८ या एका वर्षात बेरोजगारी दरात ४५ वर्षांत झाली नाही इतकी विक्रमी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षात ६. १ टक्के इतकी बेरोजगारी वाढली. ही माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज बुधवारी आर्थिक विकास व गुंतवणुक तथा रोजगार वाढवण्याच्या दृष्टीने या नव्या समित्यांची स्थापना केली आहे. गुंतवणुक व विकासावर आधारित समितीत गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचा समावेश आहे.

आर्थिक सर्वेक्षण करणार –

वाढती बेरोजगारी आणि न मिळणाऱ्या नोकऱ्या यावर उपाय म्हणून मोदी सरकारने लवकरच आर्थिक सर्वेक्षण करण्याची तयारी केली आहे. हे सर्वेक्षण पहिल्यांदाच फेरीवाले, स्वयंरोजगार करणाऱ्यांना विकासाच्या मुख्यधारेमध्ये आणण्यासाठी करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, हे आर्थिक सर्वेक्षण जूनच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे.