राष्ट्रवादीला लागोपाठ दोन ‘धक्के’ ! वैभव पिचड सीएमच्या भेटीला, सचिन अहिर मातोश्रीच्या दारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. बुधवारी आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असतानाच आज राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत आधीच राष्ट्रवादी कमकुवत असताना अहिर यांच्या जाण्याने ती आणखी कमकुवत होणार आहे.
सचिन अहिर यांनी बुधवारी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ भेटली. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले.

रात्री त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी ११ वाजता मातोश्री वर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सचिन अहिर यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे.

शरद पवार यांचे कट्टर समर्थक व अनेक वर्षे मंत्रीपदी असलेले मधुकर पिचड यांचे पुत्र आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे पिचडही भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या दोघांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत.