दारुसाठी सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, दोनजण गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करुन आईकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना एमएचबी पोलिसांनी आज अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघांना ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आकाश रामाद शिवाग आणि सुजित गुरुमखसिंग हिर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींना दहिसर येथील एका बारजवळ सापळा रचून अटक करण्यात आली. याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाच्या आईने एमएचबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार महिलेचा कपडे विकण्याचा व्यवसाय असून त्या दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये राहतात. आरोपी देखील त्याच परिसरात राहतात. आरोपींकडे दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी महिलेच्या सहा वर्षाच्या मुलाचे अपहरणाचा कट रचला. महिलेकडे खूप पैसे असल्याने ती लगेच पैसे देईन अशी अपेक्षा आरोपींना होती.

ठरल्याप्रमाणे आरोपींनी रविवारी सायंकाळी सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आकाशने मुलाच्या आईला फोन करुन मुलाच्या अपहरणाची माहिती दिली. २० हजार रुपये दिल्यानंतर मुलाल सोडण्यात येईल असे मुलाच्या आईला सांगण्यात आले. मुलाच्या अपहरणाची बातमी समजताच महिलेने आकाशला पैसे देण्याचे कबूल केले. मुलाच्या आईने पैसे जमा करुन ते आकाशला दिले. पैसे दिल्यावर आरोपींनी मुलाची सुटका केली.

दरम्यान महिलेचा पती घरी आल्यानंतर तीने घटनेची सर्व माहिती पतीला सांगितली. महिलेने पतीला सोबत घेऊन एमएचबी पोलीस ठाणे गाठले. तीने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले. आरोपी दहिसर येथील एका बारमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बारजवळ सापळा रचला. आरोपी बारमधून बाहेर येत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दारुसाठी पैसे नसल्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर, पोलीस उप निरीक्षक वाघचौरे, पोलीस नाईक तानाजी मोरे, हेड कॉन्स्टेबल बशीर शेख, प्रवीण जोपाले यांच्या पथकाने केली.