सांगवी पोलिसांकडून दोन सराइत गुन्हेगारांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – सांगवी पोलिसांनी अटक केलेल्या सराइत दोघांकडू 96 हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (24, रा. हडपसर, पुणे), विशाल नानासाहेब आव्हाड (19, रा. हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.

शाहरुख याच्यावर हडपसर, वानवडी, कोंढवा पोलीस ठाण्यात 18 ते 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वानवडी पोलिसांनी दंगल आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली. त्यामध्ये त्याला जमीन मिळाला होता. त्यानंतर त्याने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा गुन्हा केला. त्याचा मित्र विशाल आव्हाड याच्यावर हडपसर, वानवडी, स्वारगेट पोलीस ठाण्यात 8 ते 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तो फरार आरोपी होता.

30 मे रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास एक तरुण जगताप डेअरी चौकाकडून औंधकडे जात होता. तो वाकड वाय जंक्शन येथे पाणी पिण्यासाठी थांबला असता दोनजण दुचाकीवरून आले. त्यांनी तरुणाला लोखंडी सत्तूरचा धाक दाखवला आणि त्याद्वारे तरुणाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, रोकड आणि मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले.

पोलिसांनी दोघांना अटक करुन 60 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 30 हजार रुपये किमतीची एक मोपेड दुचाकी, 6 हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि 200 रुपयांचा एक लोखंडी सत्तूर असा एकूण 96 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिसांनी केली.

आरोग्यविषयक वृत्त –