Pune News : किरकोळ कारणावरून पुण्यात हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार

लोणी काळभोर(पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरुन एका हॉटेल व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कवडीपाट येथील दोन अट्टल गुन्हेगारांनी एका 32 वर्षीय हॉटेल व्यवसायिकावर कोयत्याने आणि काठीने सहाय्याने हल्ला केला. ही घटना थेऊर फाटा येथे शुक्रवारी (दि.8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

सागर प्रमोद तुपे (वय-32 रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी) असे जखमी झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून त्यांनी लोणी काळभोर पोलीस(Loni Kalbhor Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ उर्फ डच्या लोंढे, राज पवार (रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सागर यांचे थेऊर फाटा येथे चिंतामणी नावाचे हॉटेल आहे. शुक्रवारी संध्याकाळी तुपे यांचे पुतणे रमेश तुपे आणि गौरव तुपे दोघेजण हॉटेलवर येत होते. त्यावेळी बाहेरच्या बाजूला असलेल्या सोमनाथ आणि राज यांनी गौरव तुपेला माझ्याकडे काय पाहतो असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सागर यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करुन भांडण सोडवले. त्यावेळी सागर आणि दोन्ही आरोपींमध्ये किरकोळ बाचाबाची झाली.

दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी रात्री पुन्हा दुचाकीवरून हॉटेलमध्ये आले. त्यावेळी सागर आणि हॉटेलमध्ये काम करणारा कामगार महेश आंबेकर होते. आरोपी लोंढे याने तुला लय मस्ती आली का असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने सागर यांच्या पाठीवर वार केले. तर राज पवारने हातातील लाकडी दांडक्याने कपाळावर, डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.