धक्कादायक ! हडपसर येथे कॅनलमध्ये २ तरुणांचे मृतदेह सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात कॅनलमध्ये २ तरुणांचे मृतदेह बुधवारी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले असून त्यातील एक जण काल पोहताना खडकवासला येथे बुडाला होता. तर दुसऱ्या तरुणाची केवळ ओळख पटली आहे.

मयुर भीमदेव जाधव (वय १७, राहणार बालेवाडी), अजय शिंगाडे (वय २०) अशी दोघांची नावे आहेत.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील शिंदेवाडी येथून जाणाऱ्या कॅनलमध्ये सकाळी स्थानिकांना एका तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तो मृतदेह कॅनलमधून बाहेर काढला. त्यानंतर एका तासाच्या फरकाने दुसरा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तो मृतदेहदेखील कॅनलमधून बाहेर काढला. दोन्ही मृतदेहांची ओळख त्यांनी पटवली आहे. त्यातील एकजण काल पोहायला गेल्यानंतर खडकवासला येथे बुडाला होता. मयूर जाधव असं त्याचं नाव आहे. त्याला शोधण्यासाठी काल अग्निशमनच्या पथकाने शोधमोहिम राबविली होती. परंतु सायंकाळपर्यंत त्याचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर आज सकाळी तो वाहत ह़डपसरपर्यंत आला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे.