‘कोरोना’चा वाढता प्रसार लक्षात घेता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. १४ आणि १५ डिसेंबरला हे अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यातच आता दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीस पोषक नसल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते पंढरपुरात बोलत होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यावर नाना पटोले यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. ते म्हणाले, “कोरोनाचे संकट अजून गेले नाही. अधिवेशनासाठी गर्दी होऊ शकते. अनेक प्रश्नांसाठी लोक जमतात. त्याने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. मात्र, दोन दिवसांचे अधिवेशन लोकशाहीसाठी पोषक नाही. त्यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीसाठी कसे चालेल, याकरिता नवीन नियमावली कशी करता येईल यावरती चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं.”

केंद्र सरकारने तोडगा काढावा
केंद्र सरकारने पास केलेलं कृषी विधेयक बिल शेतकऱ्यांच्या विरुद्ध, शेतमजुरांच्या विरुद्ध आहे. मजूर व अन्य शेती संबंधित असलेल्या कामगार यांच्या विरुद्ध विधेयक पास करून सर्व सामान्य शेतकऱ्यांची गळचेपी करणारे विधेयक आहे. सर्व देशभर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व राज्यांतून शेतकरी वर्ग एकत्र आला आहे. सध्या दिल्ली खूप थंडी असून, लाखो शेतकरी रस्त्यावर आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढावा, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

चर्चेतून पळ काढण्याचा सरकारचा प्रयत्न – फडणवीस
“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभं ठाकलं आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कापूस, सोयाबीन या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसतोय, तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा होण्यासाठी किमान दोन आठवड्यांसाठी अधिवेशन घ्या, अशी आमची मागणी आहे. पण ती सरकारकडून मान्य होत नाही.”

यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली असून, २ दिवसांचे अधिवेशन म्हणजे राज्यासमोर असलेल्या जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेतून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.