‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पावसाळी ‘अधिवेशन’ केवळ दोन दिवसांचे, आमदारांची होणार अँटिजन चाचणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार असून ज्या आमदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला. कामकाज सल्लागार समितीने याबाबत आज निर्णय घेतला आहे.

दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनासाठी प्रत्येक सदस्यांना कोरोनापासून सुरक्षितता म्हणून सुरक्षा किट दिले जाणार आहे. कोरोनना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे सदस्यांच्या पीएना आतमध्ये प्रवेश मिळणार नाही. मात्र, त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहन चालकांना देखील बसण्याची तसेच त्यांच्या नाश्ता, चहापाणी स्वतंत्र व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार आहे.

प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीत देखील शारीरिक अंतराचे नियम पाळून सदस्यांची आसन व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आणि इतर आजार असलेल्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या पक्ष गट नेत्यांकडून काळजी घेण्याची सूचना देण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून पावसाळी अधिवेशन होणार आहे. शोक प्रस्ताव, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव अ‍ॅड. राजेंद्र भागवत यांनी दिली.