Mumbai : विधीमंडळाचे उद्यापासून हिवाळी अधिवेशन !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. दोन दिवसांचेच हे अधिवेशन असून त्यात पुरवणी मागण्या मांडून आणि दिवंगत आजी-माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहून पहिल्या दिवसाचे कामकाज संपेल. त्यामुळे अधिवेशनाला केवळ एकच दिवस मिळणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे सरकारला घेरण्याची संधी कमीच असेल. त्याच वेळी विधानपरिषद निवडणुकीच्या विजयाने आत्मविश्वास वाढलेले सरकार अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करेल.

राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे, ही सरकारसाठी जमेची बाजू असेल. महाविकास आघाडी सरकारला अलीकडेच एक वर्षे पूर्ण झाले. तिन्ही पक्षांमध्ये एकी असल्याचे विधानपरिषद निवडणूक निकालातून दिसले. अधिवेशनातही तसेच चित्र बघायला मिळेल, असे दिसते.

विधिमंडळ अधिवेशनाला कोरोनाचा फटका
मार्चमध्ये अर्थसंकल्‍पीय अधिवेशन सुरू असताना कोरोनाचा प्रसार नुकताच सुरू झाला त्यामुळे हे अधिवेशन गुंडाळावे लागले होते. पावसाळी अधिवेशनही लांबले व ते सप्टेंबरमध्ये घेण्यात आले. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाचे सावट लक्षात घेता, मुंबईतच हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय कामकाज सल्‍लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे अधिवेशनही ७ डिसेंबरला घेण्यात येणार होते. मात्र, आता १४ आणि १५ डिसेंबर असे दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात महिला, बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात शक्ती कायद्याचे विधेयक मांडण्यात येणार आहे.