20 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या विधानसभेचं अधिवेशन, पुर्वीच वीस कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशच्या पावसाळी अधिवेशनाला दोन दिवसांनी सुरूवात होणार आहे. परंतु अधिवेशनापूर्वीच विधानसभेचे तब्बल 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. 600 कर्मचार्‍यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 20 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यामध्ये सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे.

उत्तर प्रदेशात पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व आमदार आणि विधानसभेच्या कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे विधानसभेचे अधिवेशन तीन दिवसीय असणार आहे. सोमवारी 600 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अन्य 580 जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी दिली.

कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात सर्व पक्षीय सदस्यांसोबत बैठक पार पडली आहे. अधिवेशनादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी प्रत्येक सदस्य एक सीट सोडून बसणार आहे. यासाठी लॉबीचा परिसर आणि प्रेक्षक गॅलरीचाही वापर करण्यात येणार आहे. नियमांनुसार 6 महिन्यांच्या कालावधीत विधानसभेचे अधिवेशन बोलावणे आवश्यक आहे. त्यामुळेच तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन केल्याचंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितले आहे.