Pune News : प्लॅस्टीकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुक्या जीवांच्या वेदना समजणारे काही व्यक्ती आजही समाजात असल्याचा प्रत्यय पुण्यात आला आहे. प्लॅस्टिकच्या बाटलीत तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका करुन त्याचा जीव वाचवण्यात पुण्यातील पंडोल दापत्यांना अखेर यश मिळाले आहे. सुटका होताच कुत्र्याने सुटकेचा निश्वास टाकत धुम ठोकली. मुक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून त्यांचे कौतुक होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील फिरोज पंडोल व प्रतिमा पंडोल दाम्पत्य कामानिमित्त सासवडला गेले होते. दरम्यान सासवड बस स्थानका समोर बुधवारी रात्री एक कुत्र्याचे तोंड प्लॅस्टिक बाटलीत अडकल्याची माहिती फिरोज पंडोल यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या ठिकाणी पंडोल यांनी बराच शोध घेतला मात्र त्यांना कुत्रा काही सापडला नाही. हताश होत पंडोल यांना परत फिरावे लागले.

दोन दिवस या घटनेचा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच शुक्रवारी (दि. 18) सकाळी सासवड बस स्थानकासमोर सदर कुत्रा असल्याची माहिती पंडोल यांना मिळाले. पंडोल यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेदरलेल्या कुत्र्याला पकडण्याचे मोठ आव्हान त्यांच्यासमोर होते. बुधवारी रात्री पासून शुक्रवारी सकाळी पर्यंत कुत्र्याचे तोंड त्या प्लॅस्टिक बाटलीत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंडोल यांनी चपळाईने कुत्र्यावर झेप घेत त्याला पकडले. अतिशय हुशारीने कटरच्या साह्याने प्लॅस्टिकची बाटली कापून कुत्र्याचे तोंड बाहेर काढले व सुखरुप त्याची सुखरूप सुटका केली. या कामगिरीमधे प्रतिमा पंडोल, निलेश मोरे, पवन गुप्ता, अक्षय दिवटे, संदीप निशाद व राकेश दास यांनी सहभाग घेतला होता.