दिवे घाटात वारकरी दिंडीमध्ये JCB घुसून अपघात, नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजासह दोघे ठार, 15 जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवे घाटात वारकर्‍यांच्या दिंडीमध्ये जेसीबी घुसल्याने भीषण अपघात झाला असून यामध्ये 2 वारकर्‍यांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार चालु आहेत. अपघात झाल्याचे समजताच बंडा तात्या कराडकर हे नोबल हॉस्पीटलला पोहचले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


हा अपघात पंढरपूर ते आळंदी वारी करणार्‍या दिंडीला सासवड जवळील दिवे घाटात झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संत नामदेव पालखी सोहळयाची दिंडी सालाबादाप्रमाणे पंढरपूर ते आळंदी निघाली होती. आळंदीकडे येत असताना दिवे घाटात हा अपघात झाला आहे. जेसीबी चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी थेट दिंडीत घुसला. जेसीबी दिंडीत घुसल्याने कोणाला काहीच समजत नव्हते.

या अपघातात 2 वारकर्‍यांचे प्राण गेले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातात किमान 15 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास (36) आणि अतुल महाराज आळशी (24) हे दगावले आहेत.

Visit : Policenama.com