स्कूलबस-ट्रकच्या भिषण अपघातात बाप-लेक ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूलबसला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मुलीसह वडील जागीच ठार झाले. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. दिवाळीच्या सुट्या लागल्याने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी स्कूलबस साक्रीकडून दहिवेलकडे निघाली होता. दीपाली संदीप गावीत (१३), संदीप ब्रिजलाल गावीत अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.

साक्री तालुक्यातील छडवेल पखरून या गावाजवळ साक्रीकडून दहिवेलकडे जाणारी स्कूलबस तर दहिवेलकडून येणारा ट्रक या दोन्ही वाहनांमध्ये हा अपघात झाला. अपघातातील सर्व विद्याथी साक्री तालुक्यातील असून, स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल अजंग (ता. मालेगाव) येथे शिकत आहेत. सकाळी घरी जाण्यासाठी गावाकडील वाहनाने जात असताना हा भीषण अपघात घडला.

दिलवर एकनाथ चौरे (वय १०, रा. पाचमौली), करीना मनोहर कांबळे (वय १३, जामखेली), दीक्षांत भरत गावीत (वय १०, पिंजारझाडी), मृणाल कन्हैया भोये (वय १०, जामखेली), भारती भिमराव बागुल (वय १३, रा. गुलतारे), कन्हैया तुळशीराम भोये (वय ३०, जामखेली) भरत आत्माराम गावित (वय ५०, पिंजारझाडी), हिरालाल ब्रह्मा चौरे (वय ५५, पाचमौली), राजेंद्र भगवान पवार (वय ५५, मावजीपाडा), वीरेंद्र राजेंद्र पवार (वय १०, मावजीपाडा) हे अपघातात जखमी झाले आहेत. या जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी. पी. गोयल, डॉ. श्रेणीक पंडित, डॉ. कुणाल भदाणे आदींनी उपचार करून धुळे येथे उपचारासाठी पाठविले. ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी, नागसेन शिरसाठ, जितेंद्र जगदाळे आदींनी सहकार्य केले.