पुण्याहून कोकणात सहलीला जाणारी बस ताम्हिणी घाटात कोसळली ; २ ठार, २४ जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातून कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. ठार झालेले दोघे एकाच कुटुंबातील असून एक महिला आणि पुरुषाचा यात समावेश आहे.

संजिवनी निवृत्ती साठे (वय. ५५, रा. डी. पी. रोड औंध) ही महिला जागीच ठार झाली आहे. तर आणखी एक पुरुषाचा मृत्यू झाला. पुनम योगेश लांडे (वय. ३४), हर्षवर्धन योगेश लांडे (वय. ७), दक्ष जाधव, रियांश जाधव, ऋषा जाधव, ऋषिकेश कोंढाळकर, शितल विशाल काळे, विशाल शिवाजी काळे, लौकिक विशाल काळे, स्मिता विलास सुर्यवंशी, रेश्मा प्रशांत जाधव, पुष्पा कोंढाळकर, बाळासाहेब पवार, तनिष्का गोफणे, माणिक काळे, निवृत्ती साठे, अनघा जाधव, अनिल पवळे, प्रभा पवार, योगेश पाठक, विधीता जाधव, श्रावणी पाठक आणि बसचालक अशी जखमींची नावे आहेत. काही जणांवर मुळशी, औंध आणि पौड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुण्यातील एक कुटुंब सुट्टी असल्याने कोकणात फिरायला निघाले होते. कुटुंबातील लोक आणि त्यांचे नातेवाईक असे २६ जण खासगी बसने कोकणात सहलीसाठी निघाले. पुण्यातून रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांची बस मार्गस्थ झाली. त्यानंतर ताम्हीणी घाटातून ही बस कोकणात जाण्यासाठी रवाना झाली. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही बस ताम्हीणी घाटातील वंदन हॉटेलच्या समोर आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस एका पुलावरून खाली ओढ्यात कोसळली. रात्री झोपेत असताना अचानक हा प्रकार घडल्याने कोणालाही काही समजले नाही. त्यानंतर काही जण बसमधून बाहेर पडले. तेथे मोबाईलला नीट सिग्नल मिळत नव्हते. त्यामुळे थोडेसे पुढे येऊन एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून पौड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर यात एक महिला आणि एका पुरुषाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांची नावे अद्याप समजली नाहीत. काही जखमींवर मुळशीमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.