नागपूरात जमावाकडून 2  डॉक्टर्सला बेदम मारहाण; डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.  दरम्यान  कोरोनाच्या या संकटात डॉक्टर्स, नर्सेस देवदूत बनून काम करत आहेत. मात्र असे असतानाही डॉक्टरावरील हल्ले कमी होताना दिसत नाहीत. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 2 डॉक्टरांना जमावाने बेदम मारहाण केली. शनिवारी (दि. 8) सायंकाळी सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील  2 निवासी डॉक्टरांना मारहाण झाली आहे.  शनिवारी सायंकाळी मेडिकल चौकात 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी 2  डॉक्टरांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करा अन्यथा संपावर जाऊ असा इशारा नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान हल्लेखोर हे कोण होते आणि त्यांनी या दोन डॉक्टरांना मारहाण का केली?  हे समजू शकले नाही.