धुळे : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वन कर्मचारी जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे तालुक्यातील देऊर गावात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वनमजूर चंद्रकांत पितांबर सोनवणे (वय- 54 रा. नांद्रे) आणि दिलीप पांडुरंग पाटील (वय- 48 रा. कुसुंबा) असे जखमी झालेल्या वन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

म्हसदी तालुक्यातील साक्री येथील शेतकरी भास्कर देवरे यांच्या देऊर शिवारातील शेतात तीन दिवसांपासून बिबट्या दिसत होता. देवरे यांनी याची माहिती वन विभागास दिली. वन विभागाने शुक्रवारी रात्री देवरे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. आज सकाळी सात वाजता वनविभागाचे कर्मचारी बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने वनमजूर सोनवणे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या उजव्या पायाचा लचका तोडला. तर पाटील हे देखील यामध्ये जखमी झाले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनपाल मुकेश सोनार, वनरक्षक अनिल पाटील आर. डी. भामरे राकेश पाटील वनमजूर प्रकाश बोरसे दिलीप जाधव यांचे पथक आले होते.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून सोनवणे याना सोडवले. सोनवणे यांना तातडीने भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राजपूत यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बिबट्याचा वावर शेतात असल्याने परिसरातील नागरीकांत भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला लवकरात लवकर पिंजऱ्यात पकडुन जंगलात सोडावे अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/