Video : केवळ १७ मिनिटात चोरट्यांनी ‘लंपास’ केली फॉर्च्यूनर, एकाच रात्रीत पुण्यातून ३ कार ‘गायब’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातून महागड्या गाड्यांच्या चोरीचे सत्र सुरुच आहे. मागील काही महिन्यांपुर्वीच नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्यूनर पळविल्याची घटना ताजी असतानाच एकाच रात्रीत कसबा पेठ, कोथरुड आणि शिवाजीनगर परिसरातून चोरट्यांनी फॉर्च्यूनर कार लंपास केल्या आहेत. चोरट्यांनी कार लंपास करतानाचे छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. चोरट्यांनी एक गाडी चक्क १७ मिनिटांतच लंपास केली आहे.

याप्रकरणी राजवर्धन शितोळे यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर शिवाजीनगर आणि कोथरुड पोलीस ठाण्यातही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर, कोथरुड आणि फरासखाना पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ३० एप्रिल रोजी या तिन्ही फॉर्चूनर गाड्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.

शितोळे यांनी कसबा पेठेत त्यांची फॉर्चूनर पार्क केली होती. त्यावेळी मध्यरात्री चोरट्यांनी ती पळविली. त्यासोबतच कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांचीही फॉर्चूनर त्यांच्या तोफखाना इथल्या घराजवळ पार्क केली होती. तीदेखील चोरीला गेली. तर त्याच रात्री कोथरूडमधूनही फॉर्चूनर चोरीला गेली आहे. चोरट्यांनी केवळ १७ मिनिटांत ही फॉर्चूनर चोरली असून त्याचे सीसीटिव्ही फुटेज मिळाले आहे. कसबा आणि शिवाजीनगर परिसरातून फॉर्चूनर पळविणारे चोरटे एकच आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नगरसेवक दीपक पोटे यांच्या घरासमोर पार्क केलेली फॉर्चूनर चोरट्यांनी पळवली होती. तिचा अजून शोध लागला नाही. त्यानंतर आता एकाच रात्रीत ३ फॉर्चूनर चोरीला गेल्याने शहरात मात्र खळबळ उडाली आहे.

You might also like