कासारसाई धरणात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – हिंजवडी पासून जवळ असलेल्या कुसगाव धारणामध्ये फिरायला गेलेल्या तरुणांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या रेस्क्यू पथकाने मृतदेह बाहेर काढले. रित्त्विक संजय गिरी (२१, रा.बिजलीनगर, चिंचवड, पुणे) आणि शुभम टेकचंद राहांगडाले (२१, सध्या रा. वाकड, पुणे मूळ रा. गोरेगाव, ता. गोरेगाव, जि. गोंदिया, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज धुळवड असल्याने वाकड येथील तरुण कुसगाव धरणावर फिरायला गेले होते. धरणाच्या कडेला काहीजण फिरत होते, हे दोघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे पाण्यात बुडाले. मित्रांनी व नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाने सायंकाळी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

गिरी हा कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. शुभम राहांगडाले हा हडपसर येथील एका कंपनीत कामास होता. तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.