पुणे/शिरूर : मंदिरामागं बसून त्यांनी ढोसली दारू, नंतर आपल्याच मित्राला संपवलं

शिरुर / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ वादातून दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मित्रांनी आपल्याच मित्राचा खून कल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यात घडली आहे. शिरुर तालुक्यातील आमदाबाद येथे ही घटना घडली असून एकनाथ दत्तात्रय जाधव (वय-37) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.25) एकनाथ जाधव, वामन विठ्ठल खोपटे (वय-40) आणि आप्पा उर्फ रोहित शिवाजी गवळी (वय-23 तिघे रा. जावळा) हे तिघे आप्पा गवळी याच्या हिरो होंडा मोटारसायकल (एमएच 12 0188) वरून आमदाबाद येथे आले होते. या तिघांनी आमदाबाद येथे एका मंदिरामागे एकत्रित बसून दारू प्यायली.

दारू पित असताना त्यांच्यामध्ये त्याच ठिकाणी भांडण झाले. त्या भांडणानंतर वामन खुपटे आणि रोहित गवळी यांनी मिळून एकनाथ जाधव याला मारहाण केली आणि त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर एकनाथच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांना आमदाबाद रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या नाल्यात मृतदेह फेकून दिला.

पारनेर व शिरूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शिरूर हद्दीत गुन्हा घडल्यामुळे शिरूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. याबाबत अनिल एकनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.