जीवलग मैत्रिणीला वाचवण्यासाठी तिनं घेतली धाव, दुर्घटनेत दोघींचे गेले प्राण

पोलिसनामा ऑनलाईन – समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला चिटकून दोन अल्पवयीन मुलींचा अंत झाला आहे. ही घटना रविवार सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत घटना घडली.

जेऊरकुंभारी येथील धनश्री मंगेश पालवे आणि बेट परीसरातील प्रगती नितीन आव्हाड या दोघी मैत्रिणींसोबत बाहेर पडल्या होत्या. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी खेळता खेळता जवळच असलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत तारेला एका मुलीचा स्पर्श झाला. हे बघितल्यानंतर तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता ती देखील विद्युत तारेला चिटकल्याने दोघींचा जागीच अंत झाला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस आणि वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघींचे मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने सुरक्षा रक्षक तैनात करून खबरदारी घेतली असती तर ही घटना घडलीच नसती असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. लवकरात लवकर याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून ठेकेदाराने खबरदारी घ्यावी, अन्यथा काम बंद करण्याचा इशारा जेऊरकुंभारी ग्रामस्थांनी दिला आहे.